पवना, मुळा, इंद्रायणी वाचवा! ८८२ जणांवर गुन्हे दाखल, महापालिकेचा ‘हरित दणका’

पिंपरी-चिंचवडच्या जीवनदायिनी असलेल्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे पात्र राडारोडा टाकून बुजवणाऱ्यांवर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. हरित लवादाच्या (एनजीटी) दणक्यामुळे ही कारवाई तीव्र झाली आहे.वर्षभरात दोन भरारी पथकांनी ८८२ जणांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून तब्बल ४४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नदीपात्रात भराव टाकणाऱ्या वाहनमालक व चालकांना चाप बसवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे की, नदीत भराव टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यांची वाहने जप्त करण्यात येतील. यामुळे ‘लँड माफियां’च्या कृत्यांना मोठी जरब बसली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे