पिंपरी-चिंचवडमधील नेहरूनगर आता झोपडपट्टीमुक्त होण्याच्या दिशेने मोठी वाटचाल करत आहे. राज्य शासनाच्या स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी (SRA) प्रकल्पांतर्गत येथील २७७७ झोपडपट्टीधारकांना आधुनिक व सुसज्ज घरे मिळत आहेत. आतापर्यंत १२४९ कुटुंबांना ३०० चौरस फुटांची घरे मिळाली असून, त्यात पाणी, वीज, स्वच्छतागृहे, लिफ्ट, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापनासारख्या सर्व सुविधांचा समावेश आहे.
या पुनर्वसनामुळे पावसाळ्यात घरात येणारे पाणी, आरोग्याचे प्रश्न आणि अस्वच्छता यांसारख्या समस्या दूर झाल्या आहेत. लवकरच यशवंत नगर आणि साईनाथ नगरमधील रहिवाशांनाही त्यांची नवीन घरे मिळतील, ज्यामुळे यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी खास ठरेल. माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले आणि माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी हा प्रकल्प झोपडपट्टीमुक्त नेहरूनगरचा संकल्प असल्याचे सांगितले. या नव्या घरांमुळे महिला आणि मुलांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण वातावरण मिळाले आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे










































