आता मुलांचा शाळेचा प्रवास सुरक्षित! नवीन स्कूल व्हॅनमुळे पालकांना मोठा दिलासा

अनेक पालक आपल्या मुलांना असुरक्षित रिक्षांतून शाळेत पाठवतात. मात्र, आता ही धाकधूक कमी होणार आहे. महाराष्ट्र शासनाने १२+१ आसन क्षमतेच्या व्हॅनला स्कूल व्हॅनचा परवाना देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे शालेय बसची अनुपलब्धता आणि वाढीव दराची समस्या दूर होईल.

या नव्या स्कूल व्हॅन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. यात जीपीएस ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि डॅशबोर्ड स्क्रीनद्वारे पालकांना मुलांच्या प्रवासावर थेट लक्ष ठेवता येईल. तसेच, उघडा दरवाजा, आग किंवा इतर धोके टाळण्यासाठी विशेष अलार्म यंत्रणा, अग्निशमन अलार्म आणि फायर स्प्रिंकलर बसवणे अनिवार्य आहे. यामुळे मुलांचा शाळेचा प्रवास केवळ सुरक्षितच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे पूर्णपणे मॉनिटर केला जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राहुल जाधव यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे