शहरातील नागरिकांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये ७ नवीन स्वस्त धान्य दुकाने होणार सुरू

पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, दिवाळीनंतर शहरात आणखी सात नवीन स्वस्त धान्य दुकाने (रेशन दुकाने) सुरू होणार आहेत. या प्रक्रियेला या आठवड्यात अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता असून, यामुळे शहरातील एकूण स्वस्त धान्य दुकानांची संख्या २५३ वरून वाढून २६० होईल.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि लाभार्थींच्या सोयीसाठी ही नवीन दुकाने सुरू करण्यात येत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, छाननी आणि स्थळ पाहणीनंतर याचा अंतिम अहवाल ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. अन्न पुरवठा अधिकारी प्रशांत खताळ यांनी ही माहिती दिली असून, दिवाळीनंतर लगेचच ही सात दुकाने सुरू होतील.
नवीन दुकाने ‘अ’ परिमंडळ आणि ‘ज’ परिमंडळ विभागात सुरू होणार आहेत.

नवीन दुकाने कुठे सुरू होणार?

  • ‘अ’ परिमंडळ (निगडी विभाग): डांगे चौक गणेशनगर, काळाखडक रहाटणी, रामनगर, पिंपळेनिलख गावठाण, मामुर्डी, शितोळेनगर. (एकूण ४)
  • ‘ज’ परिमंडळ (पिंपरी विभाग): वैभवनगर तपोवन मंदिर रोड, पिंपरी गाव, विणी चर्चजवळ गणेशनगर, दापोडी, जय शंकर मार्केट, चिंचवड स्टेशन. (एकूण ३)
    पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत एकूण ४ लाख ८९ हजार ३८७ लाभार्थी असून, यामध्ये अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सध्या २८ महिला बचत गटांमार्फत रेशन दुकाने चालवली जात आहेत. त्यामुळे या नवीन ७ दुकानांपैकी किती दुकाने महिला बचत गटांच्या वाट्याला येतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सात नवीन दुकाने सुरू झाल्याने, नागरिकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी होईल आणि वितरण व्यवस्था अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे