Orange alert issued in Pimpri-Chinchwad : मंगळवारी ५० मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांना आज पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आह. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ४०-५० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत चिंचवडमध्ये ४७ मि.मी., डुडुळगावात ५२ मि.मी. तर तळेगावात ५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीची कामे थांबली आहेत आणि अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
महापालिका आपत्कालीन विभाग सज्ज
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आपत्कालीन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. नागरिकांना २४ बाय ७ हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचल्यास त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्निशामक आणि आपत्कालीन विभागाच्या सर्व हेल्पलाइन सुरू आहेत
महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके तयार केली असून, यामध्ये नोडल ऑफिसर, अभियंता आणि मजूर यांचा समावेश आहे. ही पथके २४ तास क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपस्थित राहणार आहेत. तसेच फिरते पथकही तैनात करण्यात आले आहे. तळेगाव, लोणावळा नगरपरिषद प्रशासन आणि वडगाव व देहूगाव नगरपंचायत प्रशासन देखील सज्ज झाले आहे. या पावसामुळे संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































