पिंपरी-चिंचवडमध्ये एसटीपी प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी, कामाला तातडीने सुरुवात

Pimpri Chinchwad STP Project Approved
पिंपरी-चिंचवडमध्ये एसटीपी प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी;

Pimpri Chinchwad STP Project Approved: इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे! चिखली येथील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी सुमारे ७,००० चौरस मीटर (सुमारे ४०%) क्षेत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (एसटीपी) वापरण्याच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. २४) मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महापालिकेला आता तातडीने काम सुरू करता येणार आहे, ज्यामुळे इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यास मोठी मदत होईल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंद्रायणी नदीच्या संरक्षणासाठी चिखली परिसरात एकूण चार एसटीपी प्रकल्पांची आखणी केली आहे. त्यापैकीच एका २० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेच्या एसटीपीसाठी ही जागा वापरली जाईल. या वर्षीच्या सुरुवातीलाच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. सुधारित विकास आराखड्याच्या (डीपी) मसुद्यातही या जागेची नोंद होती, परंतु मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे आता डीपीच्या अंतिम मंजुरीची वाट न पाहता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या निर्णयामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी होईल. उर्वरित ६० टक्के भूखंड दफनविधीसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. शहराचे पर्यावरण संतुलित राहावे, जलप्रदूषण कमी व्हावे आणि पाण्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे. हा एसटीपी प्रकल्प त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यास मदत होईलच, शिवाय नदीचे नैसर्गिक सौंदर्यही अबाधित राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे