गोल पोस्ट राष्ट्रीय गेमचेंजिंग’ निर्णय! जीएसटीच्या १२ आणि २८ टक्के स्लॅबला ‘बाय बाय’

गेमचेंजिंग’ निर्णय! जीएसटीच्या १२ आणि २८ टक्के स्लॅबला ‘बाय बाय’

केंद्र सरकारने जीएसटी करप्रणालीत ऐतिहासिक बदल करत १२ आणि २८ टक्के हे दोन स्लॅब रद्द करून केवळ ५ आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवले आहेत. या ‘गेमचेंजिंग’ निर्णयामुळे लघुउद्योजकांना मोठा दिलासा मिळणार असून, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल आणि एमएसएमई (MSME) क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हा बदल अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम संतुलित करण्यास मदत करेल. दैनंदिन वापरातील वस्तू, शेतीसाठी लागणारे साहित्य, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांवरील कर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही याचा थेट फायदा होणार आहे. विशेषतः दुचाकी, थ्री-व्हीलर, एसी, टीव्ही, डिशवॉशर यांसारख्या वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आल्याने त्यांच्या किमती घटतील, ज्यामुळे विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

या बदलामुळे व्यवसाय करणे अधिक सोपे होईल. नोंदणी प्रक्रिया अधिक जलद झाली असून, परताव्याची नवी प्रणालीही लागू करण्यात आली आहे. सीए वैभव मोदी यांच्या मते, या बदलाचा फायदा सामान्य नागरिक, शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना होईल. तसेच, लुब्रॉल इंडस्ट्रिजचे संचालक जोतीराम जगताप यांच्या मते, ऑटोमोबाइल क्षेत्रावरील जीएसटी दर कमी झाल्याने वाहनांची विक्री वाढेल, ज्यामुळे इंजिन ऑइल, ग्रीस, हायड्रॉलिक ऑइल यांसारख्या औद्योगिक वस्तूंना मागणी वाढेल.

यामुळे उत्पादन आणि निर्यातीलाही नवी दिशा मिळेल. एकूणच, या निर्णयामुळे उद्योग जगतात उत्साहाचे वातावरण असून, यामुळे उत्पादन क्षमता वाढून रोजगार निर्मितीला चालना मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version