खेळण्याचं वय आहे मुलींचं हात पिवळे कराल तर खबरदार!

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या बाल संरक्षण समितीकडून कडक इशारा

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) आता बालविवाह (Child Marriage) करणाऱ्यांविरुद्ध ‘ऍक्शन मोड’मध्ये येऊन कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. खेळण्याच्या, शिकण्याच्या वयामध्ये मुलीचे हात पिवळे (बालविवाह) करण्याचा प्रयत्न केल्यास आता खबरदार! पोलिसांच्या बाल संरक्षण समितीने (Child Protection Committee) पालकांना आणि समाजाला स्पष्ट संदेश दिला आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे. आजही अनेक मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही आणि त्यांना लहानपणीच जबाबदारीच्या ओझ्याखाली ढकलले जाते. मुली केवळ एक मोठी जबाबदारी आहेत किंवा चांगले स्थळ हातचे जाऊ नये यांसारख्या भावनेंतून किंवा आर्थिक टंचाई आणि पैशांच्या आमिषाला बळी पडून बालविवाह केले जातात, असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे.

या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती, शिक्षण आणि कायद्याची मदत अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला बालविवाहाबद्दल माहिती मिळाली, तर तत्काळ पोलिस, बाल संरक्षण समिती किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधा. बालकांवरील अत्याचाराबाबत किंवा बालविवाहांविषयी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकावर तक्रार करता येते. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीनुसार स्थानिक पोलिसांकडून तातडीने कार्यवाही केली जाते.

मुलींचे आयुष्य सुरक्षित आणि निर्धोक ठेवण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि हेल्पलाइन यांनी एकत्रित काम केल्यामुळे बालविवाह रोखण्यात यश येत आहे. त्यामुळे, आता मुलींच्या भविष्याशी खेळू नका, असा इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे