गोल पोस्ट Breaking News पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बाल सुरक्षा आणि गस्तीला बळ; ४४ CCTV कॅमेऱ्यांचे ‘सुरक्षा कवच’

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बाल सुरक्षा आणि गस्तीला बळ; ४४ CCTV कॅमेऱ्यांचे ‘सुरक्षा कवच’

पिंपरी २८ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने बालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, तसेच परिसरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते, चाकण, महाळुंगे एमआयडीसी आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यांमध्ये बालस्नेही कक्षांचे एकत्रित लोकार्पण करण्यात आले.

यासोबतच, भोसरी एमआयडीसी परिसरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व महिला-बालकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ‘सुरक्षा कवच’ उभारण्यात आले आहे, ज्यांचेही उद्घाटन करण्यात आले. मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

अभिषेक स्कूल चौक, डी. वाय. पाटील चौक, मोशी टोलनाका यांसारख्या आठ संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवले आहेत. सोनसाखळी चोरी आणि अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरतील.

‘विशेष बाल पोलिस पथक’ आणि ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेले बालस्नेही कक्ष आता आयुक्तालयातील १० पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. या कक्षांमुळे १८ वर्षांखालील पीडित बालकांचे जबाब नोंदवणे, कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुलांचे समुपदेशन करणे तसेच पोलिस ठाण्यामध्ये येणाऱ्या बालकांना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण देणे शक्य होणार आहे.

अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भोसरी पोलिस ठाण्यात पार पडला, ज्यातून पिंपरी-चिंचवड पोलिसांची सुरक्षा आणि संवेदनशीलतेची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version