पैसा मोजला पण ‘लकी नंबर’च घेतला! पिंपरी-चिंचवडकरांचा फॅन्सी नंबरवर ३७ कोटींचा ‘खर्च’

लकी नंबर‘चं आकर्षण! हौस असेल तर किंमत काय पाहायची? पिंपरी-चिंचवडच्या वाहनमालकांनी याच हौसेपोटी गेल्या दहा महिन्यांत तब्बल ३७ कोटी ३१ लाख रुपये प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) तिजोरीत जमा केले आहेत. वाहनांच्या फॅन्सी क्रमांकाची वाढती मागणी आता आरटीओसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरत असून, ‘०००१‘ आणि ‘९९९९‘ सारख्या लोकप्रिय नंबरसाठी लाखो रुपयांची बोली लावली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आरटीओने जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत फॅन्सी नंबरच्या विक्रीतून ही विक्रमी कमाई केली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारने २०२४ मध्ये फॅन्सी नंबरचे शुल्क दुप्पट केले आहे. आता ‘०००१‘ या सर्वात लोकप्रिय क्रमांकासाठी चारचाकी वाहनांना थेट ६ लाख रुपये शुल्क आकारले जाते, जे पूर्वी ३ लाख रुपये होते.

बोली प्रक्रियेमुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. ज्या नंबरसाठी अनेक अर्ज येतात, त्यासाठी ऑनलाइन बोली लावली जाते आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्याला तो नंबर मिळतो. यामुळे स्पर्धा वाढून आरटीओचे उत्पन्न वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात सणांच्या कालावधीत सर्वाधिक वाहनांची विक्री झाल्याने या महिन्यात एकट्या आरटीओला ५ कोटी ८ लाख २२ हजार रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवड क्रमांक (Choice Number) निवड प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे आणि एका सीरिजमध्ये ३०० पेक्षा जास्त निवड क्रमांक उपलब्ध असतात.

‘लकी’ किंवा आवडीचा नंबर मिळावा म्हणून पिंपरी-चिंचवडकरांची ही ‘पैसा मोजण्याची’ तयारी आरटीओच्या उत्पन्नाला नवी गती देत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे