‘चेक’च्या नियमात अडकली, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भाऊबीज दिवाळीनंतर!

राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रत्येकी २००० रुपयांची भाऊबीज भेट देण्याचा तत्पर निर्णय घेऊन दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला खरा, पण कर्मचाऱ्यांच्या पदरी यंदाही ‘दिवाळीनंतर’च आनंद पडण्याची चिन्हे आहेत.

अनेक सरकारी योजना निधीअभावी रखडल्या असतानाही, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेसाठी शासनाने तत्परतेने तरतूद केली. पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असे एकूण साधारण आठ हजार कर्मचारी या भेटीचे मानकरी आहेत आणि त्यांच्या खात्यात २००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, प्रकल्प कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदीमुळे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या हाती वेळेवर पोहोचणार नाही.

भाऊबीज देण्यासाठी सेविका व मदतनीस यांची नावे एसबीआय पोर्टलला ॲड करण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी बँक खाते, पॅन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर यासह ‘रद्द केलेला धनादेश‘ (Cancelled Cheque) जमा करण्याचे आदेश दिले आहेत. नेमका हाच ‘रद्द केलेला धनादेश’ मिळण्यास वेळ लागत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

धनादेश एका दिवसात मिळत नाही आणि ही आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात विलंब होत असल्याने, बहुतांश अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपयांची ही भेट मिळणार नाही. दरवर्षीचा अनुभव यंदाही कायम राहण्याची शक्यता असल्याने, शासनाची तत्परता असूनही, कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ‘कोरडीच’ राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे