पिंपरी-चिंचवडकरांनो लक्ष द्या! उद्या पाणीपुरवठा बंद, पुढील दोन दिवसही पाणी जपून वापरा!

Pimpri Chinchwad Water Supply Disruption
पिंपरी-चिंचवडकरांनो लक्ष द्याl;

Pimpri Chinchwad water cut: शहरातील पाणीपुरवठा उद्या, गुरुवार, १२ जून रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे पूर्णपणे बंद राहणार आहे. निगडी येथील सेक्टर क्रमांक २३ मधील महापालिकेचे जलशुद्धिकरण केंद्र आणि एमआयडीसीच्या रावेत व निगडी येथील जलशुद्धिकरण केंद्रांमध्ये स्थापत्य आणि विद्युतच्या महत्त्वाच्या कामांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना गुरुवारच्या सकाळी व संध्याकाळच्या पाणीपुरवठ्याविना राहावे लागणार आहे.

शहराला रावेत बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो, जिथून एमआयडीसीही पाणी उचलते. ही दोन्ही आस्थापने गुरुवारी दिवसभर दुरुस्तीची कामे हाती घेणार असल्याने, पाणीपुरवठा पूर्णपणे थांबेल. एवढेच नाही, तर शुक्रवार (१३ जून) आणि शनिवार (१४ जून) या दोन दिवशीही पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपल्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पाणी आजच साठवून ठेवावे, जेणेकरून पुढील तीन दिवस पाण्याची टंचाई जाणवणार नाही.

या भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद;

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसर, देहूरोड कॅन्टोनमेंट, सीएमई, आर अँड डी दिघी, ओएफडीआर आणि एमआयडीसीद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व आस्थापनांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाण्याची बचत करून प्रशासनाला मदत करावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे