जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबीर

जालना ९ मार्च २०२४ : संसार सांभाळत महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबीर व महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रेशमा चिमंद्रे, इन्नरव्हील क्लब ऑफ होरायझनच्या अध्यक्षा शिखा गोयल, दीपक कार्किनोसच्या डॉ. प्रणोती हिराळकर, ज्येष्ठ लेखिका रेखाताई बैजल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रसना देहेडकर, विद्याताई कुलकर्णी, शीलाबेन रायठठ्ठा,रेवती काकड आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, विविध सामाजिक संस्था ह्या वर्षभर महिलांच्या कल्याणासाठी कार्यरत असतात. आज मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महिलांनी यासाठी पुढाकार घेतला तर नवीन पिढी ही सुशिक्षित व सुसंस्कारित घडेल. आज महिला व मुली ह्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. महिला व मुलींनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. एखादा आजार अंगावर न काढता वेळीच औषधोपचार घेतला तर पुढील गंभीर आजारापासून सुटका होते. आज गंभीर आजारावर उपचार उपलब्ध आहेत, मात्र महिलांनी गंभीर आजार होण्याची वाट न पाहता तातडीने औषधोपचार करून घ्यावेत, असा सल्लाही डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिला.

महिला आर्थिक विकास महामंडळाचे जालनाचे व्यवस्थापक उमेश कहाते यांनी प्रास्ताविकात महिला बचत गटांनी सामाजिक उपक्रमातही सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी रेखा बैजल, रसनाताई देहेडकर, सौ. विद्या कुलकर्णी, शिखा गोयल, नंदा पवार, वैशाली सरदार यांचा जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ व पोलीस अधीक्षक श्री. बंसल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वखर्चाने शौचालय बांधलेल्या अंबड तालुक्यातील डोमगाव येथील सविता बाबासाहेब शेळके तसेच जालना जिल्ह्यातील पहिल्या महिला बसचालक मीरा इंझे- साबळे यांचा जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेवून शैक्षणिक विकासावर भर द्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास महिला, महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या महिला बचत गटाच्या महिला, दीपक कार्कोनिसमधील कर्मचारी, जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टर मंडळी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा