पिंपरी-चिंचवड, दि. ६ सप्टेंबर २०२०: पिंपरी – चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी( दि. ५ सप्टेंबर) रोजी आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला.
पिंपरी चिंचवड शहरातील गुंडगिरीचा मनका मोडून काढणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास ९९ टक्के लोक कायदा पाळतात. फक्त १ टक्के लोकच कायद्याचे पालन करत नाहीत. त्यामुळे जे गुंडगिरी पसरविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. मी कुणाच्याही दबावाला बळी पडत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या व्हाईट कॉलर लोकांना देखील याचा परिणाम भोगायला लागेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांनी बेकायदेशीर उद्योग करू नयेत, अशा गोष्टी माझ्यासमोर चालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय कायद्यात राहणाऱ्या व्यक्तींशी मी सदैव पाठीशी राहणार आहे .
न्यूज अनकट प्रतिनिधी: