प्रशासकांमार्फत महापालिकेत लूटमार, विकासाच्या नावाखाली ८५० एकरांवर बुलडोझर!’ – शशिकांत शिंदे यांचा सरकारवर हल्लाबोल

Bulldozers over 850 acres in PCMC
विकासाच्या नावाखाली ८५० एकरांवर बुलडोझर!'

Bulldozers over 850 acres in PCMC sparks controversy: पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकांमार्फत मोठी लूटमार सुरू असून, विकासाच्या नावाखाली शहरात ८५० एकरांवर बुलडोझर फिरवला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झालेल्या सत्कार समारंभात बोलताना शिंदे यांनी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले.

अनेकविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले

शुक्रवारी (२४ जुलै) आयोजित या मेळाव्यात शशिकांत शिंदे आणि सरचिटणीस रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी कामगारविरोधी कायदे, ठेकेदारांची ८९ हजार कोटींची थकबाकी, वाढती हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या आणि दारू दुकानांना दिलेल्या परवानगीमुळे वाढणारी व्यसनाधीनता यांसारख्या अनेक ज्वलंत मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. “यातील कोणत्याही गोष्टीचे सरकारला गांभीर्य नाही,” अशी टीका शिंदे यांनी केली.

ते म्हणाले, “शरद पवार यांच्यामुळेच शहरात उद्योग आले. मात्र, बांधकाम क्षेत्रावरील जीएसटी आणि मेट्रो सेसमुळे सर्वसामान्य माणसाला घर घेणे आवाक्याबाहेर झाले आहे.” कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे आवाहन करत शिंदे यांनी, “कार्यकर्तेच पक्षाची खरी शक्ती आहेत,” असे अधोरेखित केले.

‘लाडकी बहीण’ योजना फसवी – रोहित पवार

यावेळी बोलताना सरचिटणीस रोहित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेतील निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या योजनेतील निकष बदलून हजारो महिलांना वंचित ठेवले जात आहे. ही योजना केवळ फसवणूक असून, निवडणुकीनंतर ती बंद होईल आणि केवळ २० टक्के महिलांनाच लाभ मिळेल,” असा गंभीर आरोप पवार यांनी केला. या सरकारला योग्य धडा शिकवण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

या कार्यक्रमाला शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रवक्ते रविकांत वर्षे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे