पिंपरीत पोलिसांना मिळणार ‘हक्काचं घर’! १५० निवासस्थानांसह अत्याधुनिक कार्यालयीन इमारत लवकरच

Pimpri Police Housing Project Approved
मिळणार 'हक्काचं घर'!

Pimpri Police Housing Project Approved: “पोलिसांना कोणी घर देता का घर?” या प्रश्नाला आता पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्णविराम मिळणार आहे! जीर्ण झालेल्या पोलिस वसाहतींमधील घरांच्या समस्येने त्रस्त असलेल्या पोलिस कुटुंबीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पोलिसांसाठी १५० नवीन निवासस्थाने आणि सुसज्ज कार्यालयीन इमारतींचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड रेल्वे स्टेशननजीक असलेल्या महावीर चौकातील पिंपरी पोलिस वसाहतीतील तीन इमारती २०२० मध्येच जीर्ण घोषित करण्यात आल्या होत्या. यामुळे ९६ पोलिस कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले होते. आता या जागेवरच अत्याधुनिक पोलिस वसाहत उभारली जाणार आहे, ज्यामुळे १५० कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळतील.

या प्रकल्पांतर्गत केवळ घरांचेच नाही, तर पिंपरी पोलिस ठाण्याची नवीन, सुसज्ज इमारतही बांधली जाणार आहे. नागरिकांना प्रतीक्षालय आणि इतर आवश्यक सुविधा येथे उपलब्ध असतील. सध्या पिंपरी पोलिस ठाण्याला लागून असलेला पोलिस मोटार वाहन विभाग ताथवडे किंवा कस्पटेवस्ती येथे स्थलांतरित केला जाईल.

याशिवाय, महत्त्वाचे म्हणजे, एम्पायर इस्टेट सोसायटीलगत असलेले परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कार्यालयही या नवीन संकुलात स्थलांतरित होणार आहे, ज्यामुळे पोलिसांच्या कामकाजासाठी अधिक सोयीस्कर वातावरण निर्माण होईल.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता आणि आता शासनाने याला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस कल्याण व गृहनिर्माण महामंडळ, मुंबई यांच्या वतीने हे बांधकाम केले जाईल. बांधकामाचे संकल्पचित्र तयार असून, वरिष्ठ पातळीवर अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. एकदा तांत्रिक बाबींची पडताळणी झाली की, लगेचच बांधकाम सुरू होईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, “पोलिस वसाहतींचे पुनर्निर्माण करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यातील पिंपरी वसाहतीच्या पुनर्निर्माणास मंजुरी मिळाली आहे. याबाबत कार्यवाही सुरू आहे. इतर वसाहतींचाही प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल.”

या प्रकल्पामुळे पोलिस दलात नव्याने दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेषतः मोठा दिलासा मिळणार आहे, कारण त्यांना राहण्यासाठी घरे शोधताना येणाऱ्या अडचणी यामुळे दूर होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे