दिवाळीपूर्वी पिंपरी पोलिसांचा कडक इशारा नियम मोडल्यास होणार कायदेशीर कारवाई
दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांच्या बेकायदेशीर विक्रीला पायबंद घालण्यासाठी पिंपरी पोलिसांनी कंबर कसली आहे. परवान्याशिवाय फटाके विकणाऱ्यांवर आता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, अशा विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण फटाका विक्रीचा व्यवसाय करतात, मात्र यासाठी पोलीस आणि अग्निशामक विभागाची परवानगी, तसेच विविध ‘ना हरकत’ (NOC) प्रमाणपत्रे घेणे बंधनकारक आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी गर्दीच्या, गजबजलेल्या मार्गावर आणि दाट वस्तीच्या भागात फटाके विक्रीचे परवाने मंजूर न करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे या भागातील विक्रेत्यांनी परवान्यासाठी अर्जच करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागानेही विक्रेत्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
विक्रेत्यांसाठी आवश्यक खबरदारी
फटाका विक्रेत्यांनी दुकानात अग्निरोधक उपकरणे लावणे, दुकाने समोरासमोर नसणे, तेलाचा किंवा खुला विद्युत दिवा न वापरणे, दुकानाच्या ५० मीटर परिसरात आतषबाजी न करणे, लाकडी रॅक किंवा कापडी शामियाना टाळणे, तसेच ज्वलनशील पदार्थ न ठेवणे, हे नियम पाळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, १८ वर्षांखालील मुलांना फटाके विकू नयेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन
सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास नागरिकांनी त्वरित अग्निशामक विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून करण्यात आले आहे. सुरक्षित दिवाळी साजरी करण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































