पुरंदर, दि. १८ जून २०२०: पुरंदर मधील पिंगोरी गावाची कृषी विभागाच्यावतीने यावर्षीच्या शेती शाळेसाठी निवड करण्यात आली आहे. आज दि.१८ रोजी पहिली शेती कार्यशाळा पार पडली. यामध्ये येथील शेतकऱ्यांना अंजीर लागवडीबाबत माहिती देण्यात आली त्याचबरोबर सिताफळाला येणाऱ्या रोगांबाबत हि माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान यंत्रणा अर्थात आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगोरी येथे तालुका कृषिअधिकारी अंकुश बरडे व मंडळ कृषी अधिकारी अनिल धुरगूडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत वर्षभरामध्ये पिंगोरी येथे सहा शेतीशाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये पिंगोरी येथील शेतकऱ्यांना अंजीर लागवड व व्यवस्थापन यावर वेगवेगळ्या कृषी तज्ञा मार्फत मार्गदर्शन, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाणार आहे. आज यातील पहिली शेतीशाळा पारपडली यावेळी शेतकऱ्यांना शेती शाळेची गरज व शेती शाळेतून दिले जाणारे शिक्षण शेतीसाठी किती पूरक आहे याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच पिंगोरी परिसरामध्ये वातावरण अंजीर पिकासाठी पोषक असल्याने या भागात अंजीराच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये अंजिराच्या वेगवेगळ्या जाती, त्यांची लागवड कधी व कशी करावी? व त्यांना बाजारपेठ कोठे उपलब्ध आहे? त्याचबरोबर त्यावर कोणकोणते प्रक्रिया उद्योग सुरू करता येतात? याबद्दलची माहिती कृषी तंत्रज्ञानचे गणेश जाधव यांनी दिली. यावेळी पिंगोरी पोलीस पाटील राहुल शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले, प्रगतशील शेतकरी विष्णू चौधरी, कल्याण धुमाळ, ज्ञानेश्वर शिंदे, भगवान शिंदे, महादेव शिंदे, कृषी सेवक अंजली शिंदे, कृषी पर्यवेक्षक चेतन भागवत, सरस्वती बिराजदार, मुक्ता सोळंखी, मनोज झांजरे यांच बरोबरच तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या वेळी आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप यादव यांनी सीताफळाला येणाऱ्या वेगवेगळ्या रोगां संदर्भात व व्यवस्थापना संदर्भात माहिती विचारली. यावेळी शेती विषयक माहिती मिळावी म्हणून तरुणांच्या मागणी नुसार शेतकऱ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप स्थापन करण्यात आला या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांची तंत्रज्ञानाची व बी बियाण्यांची यांची माहिती देण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे