इंदापूर ८ जानेवारी २०२१ : नैसर्गिक ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून हरित इंदापूर चळवळ व्यापक करण्यासाठी आज इंदापूर नगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रशालेतील विद्यार्थी, नागरिकांच्या लोकसहभागातून अटल आनंद घनवन सारखेच ऑक्सीजन पार्कसाठी ५००० देशी वृक्ष लागवड मालोजीराजे भोसले स्मारक शेजारील भार्गवराम तलाव परिसरामध्ये करण्यात आली.
श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय, आयटीआय मधील विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग नोंदविला. यावेळी वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन वृक्ष संवर्धनाविषयी प्रबोधन करण्यात आले.
किता शहा म्हणाल्या की,’ स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर व हरित इंदापूर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्ही नागरिकांच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहोत. सध्या महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा हे अभियान सुरू आहे या अभियानांतर्गत शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. घरोघरी जनजागृतीच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन विषयीची माहिती दिली आहे. नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या शहा नर्सरी कडून मोफत वृक्ष जोपासण्याची हमी घेऊन ५००० देशी रोपे घेतली असून लोकसहभागातून आज या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. नागरिकांनी या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होऊन हरित इंदापूर साठी भरीव योगदान द्यावे.’
डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की,’ या परिसरामध्ये करंज, जांभूळ,अर्जुन,तुती, पिचकारी,वावळ, लिंब, काटेसावर या सारख्या देशी रोपांचे वृक्षारोपण केले असून त्याच्या संवर्धनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करणार आहे. नागरिकांनी देखील घरोघरी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभाग नोंदवावा.’
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, नगरसेवक प्रशांत शिताप, मनोज बारटक्के हमीद आत्तार, महादेव चव्हाण, औदुंबर चांदगुडे, सुनील मोहिते उपस्थित होते. श्रद्धा वळवडे यांनी वसुंधरा संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी केले. कार्यालयीन अधिक्षक वर्षा क्षिरसागर यांनी आभार मानले.
न्युज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे.