पुणे : धुलिवंदन म्हणजे होळीनंतरचा महत्वाचा सण. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण रंग खेळताना पहायला मिळतात. परंतु हे रंग खेळताना आपण आवश्यक ती काळजी घेतली तर आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.याची दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे.
रंग खेळून झाल्यावर जितकी केस आणि त्वचेची काळजी घ्यावी लागते, त्यापेक्षा जास्त काळजी डोळ्यांची घ्यावी लागते. जर चुकूनही डोळ्यात रंग गेला तर रंग खेळणे चांगलेच महागात पडू शकते.
रंग खेळताना डोळे सुरक्षित ठेवले पाहिजेत. त्यासाठी रंग खेळतांना आपण सर्वजण कोणती काळजी घ्याल ते आता पाहू यात.
■ खर तर रंग खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा. केमिकलयुक्त रंगांचा वापर केल्याने डोळ्यांचं आणि त्वचेचं नुकसान होण्याची भीती अधिक असते.
■ डोळ्यात रंग गेलाच तर डोळ्यांवर पाणी मारून डोळे चांगले स्वच्छ करावे.असे करतांना डोळे जोरात चोळू नका.
■ रंग खेळताना कुणावरही जबरदस्ती करू नका. कारण असे करताना रंग डोळ्यात जाऊ शकतो.
■ जर कुणाला कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याची सवय असेल तर रंग खेळताना त्या कॉन्टॅक्ट लेन्स अजिबात वापरू नका. कारण असे केल्यावर कॉन्टॅक्ट लेन्सवर रंग चिकटू शकतो. त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
■ रंग खेळताना हाताने किंवा इतरही कशाने डोळ्यांना स्पर्श करू नका. सतत डोळ्यात रंग जाणार नाही ही काळजी घ्या.
शिवाय एकमेकांना रंग लावताना जरा जपून लावा.