नवी दिल्ली, ३१ जुलै २०२३ : देशात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. २७ जुलै रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा झाला. देशातील आठ कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा १४ वा हप्ता जमा झाला. डीबीटी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. ८.५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट १७,००० कोटी रुपये जमा करण्यात आले.पण आता या योजनेत महत्वाचा बदल होणार आहे. त्याचा मोठा फायदा भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार आहे.
पुढील वर्षात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.तर यावर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. केंद्र सरकार या योजनेत मोठा बदल करणार आहे. मनी ९ च्या सूत्रानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी या योजनेत २००० हजार रुपयांची वाढ होणार आहे.सध्या या योजनेत दरवर्षी जवळपास साडे आठ कोटी शेतकऱ्यांना निधी देण्यात येतो. वार्षिक ६००० रुपये देण्यात येतात. २००० हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. या योजनेत एक हप्ता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ८००० रुपये जमा होतील.
यावर्षी जानेवारी महिन्यातही याविषयी चर्चा रंगली होती. केंद्र सरकार फेब्रुवारी २०२३ पासून जादा हप्त्याची तरतूद करेल असा दावा करण्यात येत होता. केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयी घोषणा करण्यात येणार होती. पण आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.या योजनेत आणखी एक हप्ता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा १४ वा हप्ता जमा केला. केंद्र सरकारने जवळपास १७ हजार कोटी रुपये खर्च केले.
केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर २०१८ मध्ये सुरु केली होती. त्यावेळी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरती मर्यादीत होती. पण आता या योजनेचा विस्तार झाला आहे. सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील अथवा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. १० हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर