नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं २.२३ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. बहुतांश मालमत्ता बँक ठेवींच्या स्वरूपात आहेत. पंतप्रधानांकडे आता कोणतीही स्थावर मालमत्ता नाही, कारण त्यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये आपली जमीन दान केलीय. या जमिनीची किंमत १.१ कोटी रुपये होती.
पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) वेबसाइटवर पंतप्रधानांच्या संपत्तीची घोषणा केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ पर्यंत त्यांची एकूण संपत्ती २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये होती. त्याचवेळी मोदींच्या जंगम मालमत्तेत गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.१३ लाख रुपयांची वाढ झालीय.
गेल्या वर्षी होती १.१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता
पंतप्रधानांच्या घोषित मालमत्तेनुसार, त्यांच्याकडं कोणतंही वैयक्तिक वाहन नाही.
पंतप्रधानांनी कोणत्याही बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नाही, त्यांच्याकडे स्वत:चं वाहनही नाही. त्यांच्याकडं ४ सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्याची किंमत १.७३ लाख रुपये आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत पंतप्रधानांकडे १.१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती.
मोदींनी दान केलेल्या जमिनीचा भाग गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २००२ मध्ये खरेदी केला होता. या जमिनीवर आणखी ३ जणांचे मालकी हक्क होते. यामध्ये पंतप्रधानांचा चौथा (२५%) हिस्सा होता, जो त्यांनी दान केला.
१.८९ लाखांचा जीवन विमा
पीएमओच्या म्हणण्यानुसार, पोस्ट ऑफिसमध्ये पंतप्रधान मोदींच्या नावावर सुमारे ९ लाख रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे जमा आहेत.
३१ मार्च २०२२ पर्यंत पंतप्रधानांकडे एकूण ३५,२५० रुपये रोख होती. त्याचवेळी पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या नावावर ९ लाख ५ हजार १०५ रुपये किमतीचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जमा आहे. मोदींचा १ लाख ८९ हजार २०५ रुपयांचा आयुर्विमाही आहे.
सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी संपत्तीचा तपशील दिला
गेल्या आर्थिक वर्षात सर्व २९ कॅबिनेट मंत्र्यांनी स्वतःची आणि त्यांच्या अवलंबितांची संपत्ती जाहीर केली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे २.५४ कोटी रुपयांची जंगम आणि २.९७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, आरके सिंग, हरदीप सिंग पुरी, पुरुषोत्तम रुपाला आणि जी किशन रेड्डी यांचाही यावेळी मालमत्ता जाहीर करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे. नक्वी यांनी जुलैमध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सध्या केंद्रात २८ कॅबिनेट मंत्री आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे