पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनवणी करायला पाठवले असेल, अजितदादा शरद पवार भेटीवर वडेट्टीवार यांचे विधान

चंद्रपुर, १३ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार यांनी शरद पवार यांची तीन वेळा भेट घेतली होती. त्यांनी पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात शरद पवार यांना न भेटताच काढता पाय घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एकसंघ ठेवण्यासाठी अजित पवार आणि जेष्ठ नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रयत्न करत आहेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण आता पुन्हा एकदा पुण्यात अजित पवार यांनी शरद पवारांची अतिशय गुप्त बैठक घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम असून ते भाजपबरोबर जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. शरद पवार हे इंडिया आघाडी सोबत आहेत. हे त्यांनी स्पष्ट केले आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

शरद पवार, अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीबाबत आताच निष्कर्ष काढणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याला काहीही करून भाजप समर्थनासाठी तयार करा, असा निरोप पाठवला असेल. तो देण्यासाठीच अजित पवार गेले असतील अशी खोचक टीका केली आहे. तर एकनाथ शिंदे अथवा अजितदादा पवार यांना सामील करून देखील भाजपची घसरण सुरूच असल्याने भाजपचा हा प्रयत्न आहे. भाजपकडून जनाधार असलेल्या नेत्यांना चूचकारणे सुरू केले आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा