PMC Deadline for Development Work Bills: पुणे महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी विकासकामांच्या बिलांसाठी २४ मार्च ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आणि तरतूद लॅप्स झाल्यास संबंधित विभागप्रमुख जबाबदार असतील. असा सक्त आदेश आयुक्तांनी दिला आहे.
महापालिकेच्या विविध विभागांकडून आर्थिक वर्ष संपताना शेवटच्या दिवसापर्यंत कामाची बिले सादर केली जातात. यामुळे महिन्याच्या शेवटी खर्चाचा आकडा अचानक वाढलेला दिसतो. वित्तीय नियमांशी विसंगत आणि प्रशासकीयदृष्ट्या अयोग्य असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी कठोर पाऊल उचलले आहे.
आयुक्त डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले की, अपूर्ण कागदपत्रांसह बिल सादर केल्यास किंवा बिल अदा करण्यास विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खाते आणि विभागाची असेल तसेच या निर्णयाला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.सर्व खातेप्रमुखांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती देऊन २४ मार्चपूर्वी बिले मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठवावीत असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
या निर्णयामुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवहारात शिस्त आणि पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे