पीएमपी बसचालकांचा बेशिस्तपणा कायम; तीन वर्षांत २६०२ जणांवर कारवाई, तरीही सुधारणा नाही!

21

पुणे २६ फेब्रुवारी२०२५: पुण्यात वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यात पीएमपी बसचालकांचा बेदरकारपणा अधिकच भर घालत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पीएमपी चालकांविरोधात गेल्या तीन वर्षांत २६०२ वेळा कारवाई करण्यात आली असून, तब्बल १४ लाख १७ हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, एवढ्या कारवाईनंतरही चालकांचे वर्तन जैसे थे आहे.

सिग्नल तोडणे, धोकादायक पद्धतीने बस चालवणे ठरतेय डोकेदुखी!

सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस उभी करणे, धोकादायक पद्धतीने बस चालवणे आणि बस थांब्यावर न थांबवता रस्त्यामध्ये थांबवणे असे गंभीर प्रकार सर्रास सुरू आहेत. या बेशिस्त वाहतुकीमुळे पुण्यातील रस्त्यांवर ट्रॅफिक कोंडी वाढत आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी हा मोठा अडथळा ठरत आहे.

दंडाची वसुलीही थेट पगारातून!

वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या पीएमपी बसचालकांवर ‘सीसीटीव्ही’च्या आधारे कारवाई केली जाते. दंड ठोठावल्यानंतर पीएमपी प्रशासन संबंधित चालकाची माहिती मिळवते आणि थेट त्याच्या पगारातून ही रक्कम कपात केली जाते. तरीही या नियम मोडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही.

तीन वर्षांत एवढ्या केसेस, तरीही सुधारणा नाही!

  • २०२२-२३: ७२३ चालकांवर कारवाई – ३.६१ लाख दंड
  • २०२३-२४: १,००२ चालकांवर कारवाई – ६.०५ लाख दंड

डिसेंबर २०२४ पर्यंत: ८७७ चालकांवर कारवाई कडक कारवाईशिवाय सुधारणा अशक्य!

पीएमपी चालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने ही कारवाई अपुरी ठरत आहे. त्यामुळे कठोर नियम लागू करून अधिक मोठ्या प्रमाणावर दंड आणि निलंबनासारखी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

“बसचालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. दंडाच्या रकमेत कपात थेट त्यांच्या पगारातून केली जाईल.” – नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

नियम मोडणाऱ्यांवर कठोर पावले उचलणार का?

एका बाजूला पीएमपी चालकांवरील कारवाई वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला वाहतुकीच्या नियमांची पायमल्लीही सुरूच आहे. अशा परिस्थितीत कठोर कारवाई केल्याशिवाय या बेशिस्तीवर आळा बसेल का, हा मोठा प्रश्न आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे