पीएमपीएमलने प्रवास करताय…सावधान!

पुणे : पुण्यात पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करताय? सावधान वाहकाने घाईघाईने दिलेले तिकीट हे अधिकृत तिकीट नसून स्वाईप मशीन नादुरुस्त असल्याचे दर्शविणारी ती पावती असू शकते. त्यामुळे तिकीट काढतातना त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहकाकडून हातचलाखीने ‘नॉट फॉर सेल’ च्या वाया गेलेल्या ‘डमी’ कागदाचा तुकडा प्रवाशाच्या हातावर ठेवला जात आहे. या बनावट तिकिटांच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपी वाहकांकडून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
त्यामुळे अशा बनावट तिकिटांच्या माध्यमातून प्रवाशांना लुटणाऱ्या २० वाहकांवर मागील आठवड्यांत पीएमपी प्रशासनाने निलंबनाची कारवाई सुरू केली.

बहुतांश प्रवासी तिकीट न पाहताच थेट खिशात ठेवतात. तिकीट ठळक प्रिंट नसल्यास वाहकाला कोणी जाबही विचारताना दिसत नाहीत. मात्र, प्रवाशांना याची किंचीतही कल्पना नसते की, वाहकाने आपल्या पैशांवर डल्ला मारला आहे. या माध्यमातून हजारो रुपयांची गंगाजळी वाहकांनी आतापर्यंत हडप केली आहे.

पिंपरी आणि पुण्यामध्ये धावणाऱ्या सर्व बसमधून या तिकिटांच्या स्वाईप मशिनची तपासणी केल्यानंतर हा प्रकार पीएमपी अधिकाऱ्यांच्या लक्षात आला आहे. अशिक्षित आणि अज्ञानी प्रवासी पाहून ही शक्कल अनेकदा वाहकांकडून लढविली जाते. पास नसलेल्या ज्येष्ठांनाही अशा पद्धतीचे तिकीट देऊन पैसे उकळले जात आहेत. ग्रामीण मार्गावर तर वाहक बनावट तिकिटावर स्वत:च्या हातानेच रक्कम टाकून पैसे लाटत असल्याचेही उघडकीस आले आहे.

तिकिटांच्या पैशात ही रक्‍कम ग्राह्य न धरता थेट वाहकांचा खिशात जाते. याचा फटका पीएमपीच्या उत्पन्नाला बसतो. नागरिकांनी तिकिटांची तपासणी करीत रहावी. ठराविक मार्गावरील बससाठी तिकीट किती आहे, याची विचारणा आणि शहानिशा प्रवाशांनी करावी. निलंबित केलेल्या वाहकांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. दोषींना माफ केले जाणार नाही. मात्र, नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे, असं पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले .

पीएमपीएलएममध्ये भ्रष्टाचार

‘नॉट फॉर सेल’ तिकीट म्हणजे तिकीट स्वाईप मशिनमध्ये बिघाड झाल्यास ट्रायल किंवा डमी तिकीट मशिनमधून काढले जाते. मशिन सुरू आहे की नाही. याची खात्री करण्यासाठी ट्रायल तिकिटाचा वापर केला जातो. सध्या प्रत्येक वाहकाला एक, अशी आठशे ते एक हजार स्वाईप मशिन आहेत. अशा पद्धतीने वाहकच पीएमपीएलएममध्ये भ्रष्टाचार करत असल्याचे उघड झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा