पुणे महानगर प्रदेशातील (PMRDA) उद्योगांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी पीएमआरडीएने स्वतंत्र ‘इंडस्ट्रियल सेल’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या ‘इंडस्ट्रियल सेल’मुळे औद्योगिक प्रकल्पांना गती मिळून, परवान्यांसाठी होणारा अवाजवी विलंब टळणार आहे, ज्यामुळे प्रदेशातील उद्योग-गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल.
परवानग्या आता ‘फास्ट ट्रॅक’वर!
पुणे महानगर प्रदेश हा देशातील अग्रगण्य औद्योगिक पट्ट्यांपैकी एक आहे, जिथे देशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची नवी गुंतवणूक वाढत आहे. या प्रकल्पांना आवश्यक असलेल्या बांधकाम-संबंधित मंजुऱ्या आणि विकास परवानग्या झटपट उपलब्ध व्हाव्यात यासाठी पीएमआरडीएने हे पाऊल उचलले आहे. ‘इंडस्ट्रियल सेल’मध्ये सहायक नगररचनाकार आणि सहायक संचालक हे पूर्णवेळ उपस्थित राहतील. नकाशांची पडताळणी, एफएसआय (FSI), झोनिंग आणि रस्ता आराखड्याची सुसंगती तपासणे यांसारखी महत्त्वाची कामे हा सेल पार पाडेल.
तालुकास्तरावर ‘विकास’चे अधिकार!
केवळ मुख्यालयाच्या पातळीवरच नव्हे, तर ‘पीएमआरडीए’ने तालुकास्तरावरही कार्यालये सुरू करून तेथील अधिकाऱ्यांना जास्तीचे अधिकार दिले आहेत. यामुळे स्थानिक स्तरावरच विकास परवानगी संबंधित कामकाज पूर्ण होणार असल्याने, उद्योजकांना पुण्यापर्यंत येण्याची गरज भासणार नाही आणि परवानगी मिळण्यास लागणारा वेळ बऱ्याच अंशी वाचणार आहे.
महानगर आयुक्त, डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले की, “उद्योगवृद्धीसाठी औद्योगिक संघटना आणि उद्योजकांच्या अडचणी सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच हा ‘इंडस्ट्रियल सेल’ तात्काळ कार्यान्वित करून उद्योजकांचे प्रश्न निकाली काढले जातील.”
पीएमआरडीएच्या हद्दीतील चाकण, तळेगाव, हिंजवडी-माण, रांजणगाव, कुरकुंभ यांसारख्या प्रमुख औद्योगिक पट्ट्यांतील उद्योजकांसाठी हा निर्णय संजीवनी ठरणार आहे.
*पीएमआरडीए हद्दीतील प्रमुख औद्योगिक पट्टे₹
- खेड: चाकण, नाणेकरवाडी
- मावळ: तळेगाव
- मुळशी: पिरंगुट, हिंजवडी-माण
- शिरूर: मरकळ, रांजणगाव, सणसवाडी
- दौंड: कुरकुंभ, पाटस
पीएमआरडीएचा हा गतिमान आणि उद्योगपूरक निर्णय प्रदेशाच्या रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला नवा आयाम देईल, यात शंका नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे














































