PNB घोटाळ्यातील फरार मेहुल चोक्सीला धक्का, सीबीआयने नोंदवले दोन नवीन FIR

8

नवी दिल्ली, १७ डिसेंबर २०२२: PNB मध्ये ६००० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या फरार मेहुल चोक्सीला CBI ने शुक्रवारी मोठा धक्का दिलाय. सीबीआयने चोक्सी आणि गीतांजली रत्न नक्षत्र या ब्रँडविरुद्ध दोन नवीन एफआयआर नोंदवलेत. बँकांच्या एका गटाची ५५.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने हे दोन नवीन एफआयआर नोंदवलेत. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी २०१८ च्या सुरुवातीला पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी सीबीआयने ३० जानेवारीला एफआयआर नोंदवला होता. पण, त्याआधीच या घोटाळ्यातील दोन मुख्य आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी भारतातून पळून गेले होते. तेव्हापासून दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. नीरव मोदी ब्रिटनमध्ये असून तेथील गृहमंत्रालयानं त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिलीय. मात्र, याविरोधात नीरव मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतलीय.

सीबीआयने मार्चमध्येही दाखल केला होता गुन्हा

सीबीआयने मार्चमध्ये फरार मेहुल चोक्सीविरोधातही गुन्हा दाखल केला होता. प्रत्यक्षात मेहुल चोक्सीने किंमत जास्त असल्याचं सांगून IFCI कडून हिरे आणि दागिने गहाण ठेवून २५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. या प्रकरणी सीबीआयने मेहुल चोक्सी, त्याची कंपनी गीतांजली जेम्स आणि सूरजमल लल्लू भाई अँड कंपनी, नरेंद्र झवेरी, प्रदीप सी शाह आणि श्रेनिक शाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

वास्तविक, आयएफसीआयच्या तक्रारीवरून सीबीआयने ही कारवाई केलीय. तक्रारीनुसार, चार वेगवेगळ्या मूल्यांकनकर्त्यांनी दागिन्यांची किंमत ३४-४५ कोटी रुपये ठेवली होती. त्यानंतर आयएफसीआयने चोक्सीला कर्ज दिलं. जेव्हा कंपनीने कर्ज चुकवले तेव्हा IFCI ने तारण ठेवलेल्या शेअर्स आणि दागिन्यांमधून वसूल करण्यास सुरुवात केली.

IFCI ने २०,६०,०५४ तारण शेअर्स पैकी ६,४८,८२२ शेअर्स विकून ४०६ कोटी रुपये मिळवले. तथापि, एनएसडीएलने मेहुल चोक्सीचा क्लायंट आयडी ब्लॉक केल्यामुळं कंपनी उर्वरित समभाग विकू शकली नाही.

यानंतर, जेव्हा IFCI ने तारण ठेवलेलं सोनं, हिरे आणि दागिने यांच्याकडून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं आढळून आलं की त्यांचे मूल्य मूल्यांकन केलेल्या मूल्यापेक्षा जवळजवळ ९८% कमी आहे. नुकत्याच केलेल्या मूल्यांकनात असं आढळून आलं की तारण ठेवलेले दागिने आणि हिरे यांची किंमत ७० लाख ते २ कोटी रुपये आहे.

ताज्या मूल्यांकनात असं आढळून आलं की हे हिरे निकृष्ट दर्जाचे असून ते प्रयोगशाळेत तयार करण्यात आले होते आणि मोहरे घातलेले हिरेही अस्सल नाहीत. ३० जून २०१८ रोजी, IFCI ने कर्जाला अनुत्पादित मालमत्ता म्हणून घोषित केलं. या प्रकरणात सीबीआयने मूल्यांकन करणाऱ्या आरोपींच्या कोलकाता, मुंबईसह ८ ठिकाणी छापे टाकलेत. सीबीआयने कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा