नवीन वर्षात रिकामा होणार खिसा, साबणापासून एसयूव्हीपर्यंतच्या किमती वाढणार!

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022: जर महागाईनं तुमच्या घरचं बजेट बिघडलं असेल आणि तुम्हाला 2022 मध्ये त्यातून दिलासा मिळंल असं वाटत असंल, तर तुमची निराशा होऊ शकते… कारण सध्या वस्तूंच्या किमती वाढण्याचा ट्रेंड आहे आणि अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की आत्ता पुरता महागाईचा दबाव कायम राहील. …

महागले खाण्यापिण्याचे पदार्थ

बाजारातील महागाईचा कल पाहिला तर आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती 3 ते 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुसरीकडं, अंडी, ब्रेड, केक, बिस्किट या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती गेल्या 3 आठवड्यात 8-15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ब्रिटानिया इंडस्ट्रीज, आयटीसी, पार्ले प्रॉडक्ट्स आणि एचयूएल सारख्या एफएमसीजी कंपन्यांचं म्हणणं आहे की, कृषी उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय लॉजिस्टिक आणि पॅकेजिंग मटेरियलच्या किमतीतही वाढ झालीय.

गुंतवणुकदारांशी नुकत्याच झालेल्या संवादात, ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी म्हणाले, “कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीच्या परिस्थितीत किमती वाढवण्याशिवाय आमच्याकडं पर्याय नाही. म्हणूनच आम्ही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने वस्तूंच्या किंमती 6% पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. कंपनी काही उत्पादनांच्या किमती वाढवणार असंल तर काहींच्या वजनात बदल करंल.

पार्लेने गेल्या वर्षी मार्चमध्ये आपल्या उत्पादनांच्या किमती 10% पर्यंत वाढवल्या होत्या. आता कंपनी पुन्हा 20 रुपये किंवा त्याहून अधिक एमआरपी असलेल्या उत्पादनांच्या किमतीत 5 ते 10% वाढ करणार आहे.

साबण-सर्फही महाग होईल

2022 मध्ये केवळ खाद्यपदार्थांच्याच नव्हे तर साबण आणि सर्फच्या किमतीही वाढणार आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), लक्स, डोव्ह, लाइफबॉय, रिन आणि सर्फ एक्सेल सारखी उत्पादनं बनवणारी कंपनी, डोव्हच्या किंमतीत 12%, लक्स 10% आणि सर्फ एक्सेल 20% ने वाढवणार आहे.

गाड्याही महागल्या

देशातील बहुतांश कार कंपन्यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात किमती वाढवल्या आहेत. गेल्या एका वर्षात मारुतीने आपल्या कारच्या किमतीत तीन वेळा वाढ केलीय. त्याचवेळी महिंद्रा, किया, होंडा, फोक्सवॅगन, टोयोटा आणि टाटा ते मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि व्होल्वोसारख्या कंपन्यांनीही आपल्या गाड्यांच्या किमती 1 ते 4 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत कार खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला 8 हजार ते 60 हजार रुपयांचा फटका बसणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा