पोळी स्टफ पिझ्झा

पोळ्या उरल्या तर फार तर फार कुस्करा किंवा वरणफळं केले जातात आणि घरातली बच्चे कंपनी ते काही खात नाही. मग आपण त्यांना याच पोळ्यांचा पिझ्झा करून दिला तर ते आवडीने खातील हे नक्की.

साहित्य:

उरलेल्या पोळ्या, पिझ्झा सॉस, केचप, घरात शिल्लक असतील त्या भाज्या (पालक, मश्रुम, शिमला मिरची, कांदा पात, बेबी कॉर्न) असल्यास पनीर आणि अंडा बुर्जी, चीझ, फोडणीसाठी तेल, लसूण, मीठ, ड्राय हब्र्ज.

कृती:
सर्वच भाज्या आपल्या घरात असणे, बंधनकारक नाही. यापैकी ज्या असतील आणि आवडत असतील त्या छान बारीक चिरून लसणीच्या फोडणीवर थोड्याशा परतून घ्या. मीठ आणि ड्राय हब्र्जही त्यात घाला आणि शिजवून घ्या.

पोळीवर पिझ्झा सॉस लावा. पण पोळी फार ओली होणार नाही, याची काळजी घ्या. आता यावर शिजलेल्या भाज्या आणि अंडा बुर्जीचा थर लावा त्यावर चीझ किसून घाला. यावर पोळी लावा आणि त्यावर परत आधीप्रमाणे थर लावून घ्या. आता पोळीने ते बंद करा. असे हवे तितके थर लावून मग ही थरांची पोळी गॅसवर ठेवा.
त्यावरच चीझ किसून घाला. मंद आचेवर चीझ वितळेपर्यंत पोळी छान शेकवून घ्या. तुमच्याकडे जर चिकन असेल तर तेही अगदी बारीक चिरून आणि वाफवून यासोबत वापरू शकता. तुमचा स्टफ पिझ्झा तयार आहे. आता त्रिकोणी कापून खायला घ्या. तुम्ही अंडा बुर्जीऐवजी चिकनसुद्धा वापरू शकता, फक्त ते नीट साफ करून, वाफवून आणि बारीक तुकडे करून घ्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा