पिंपळी (बारामती), दि. १० जुलै २०२०: बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या पिंपळी गावातील गावठी रासायनिक हातभट्टीवर बनवणाऱ्या अडयावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धाड टाकुन १ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये तयार केलेली रासायनीक दारू, कच्चा माल, कॅन, बॅरल व दारूचे साहित्य समावेश आहे.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजा वरून खडे बोल सुनावल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचुन पिंपळी गावच्या हद्दीत कॅनॉल लगतच्या अंतर्गत रस्त्याच्या जवळ गावठी दारूच्या भट्टीवर आज छापा टाकला.
यावेळी अलका शशिकांत पवार (रा. इंद्रायणी नगर, पिंपळी ता. बारामती) यांच्यासह दारुसाठी कच्चामाल देणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,पोलीस फौजदार संदिप गोसावी, सुरेश भोई, तानाजी गावडे, संदेश ओमासे, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, शरद गावडे, जयश्री गवळी, लता हिंगणे कारवाई मध्ये सहभागी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव