पोलीस भरती निवड प्रक्रियेमध्ये मोठा बदल

मुंबई: पोलिस भरतीसाठी सध्या प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाते. दोन्ही चाचण्यांतील एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवडीची यादी जाहीर होते. परंतु आता नवीन बदलानुसार पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल.

सध्या चालू असलेल्या निवडप्रक्रिया मुळे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार पुढे शारीरिक चाचणीत अनुत्तीर्ण होतात. त्यामुळे पोलिस दलाला योग्य आणि सक्षम जवान मिळण्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ही त्रुटी लक्षात आल्याने पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या अनेक बेरोजगार युवा-युवतींनी अगोदर मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीला दाद देत या परीक्षांमध्ये व चाचण्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. पोलिस भरतीची प्रक्रिया दुरुस्तीनंतर आता उमेदवारांना अनेक नव्या बदलांना सामोरे जावे लागेल. त्यांना सोळाशे आणि शंभर मीटर अशा दोन गटांमध्ये धावावे लागेल. गोळाफेक, लांब उडी, पुलअप्स या प्रकाराची १०० गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. याआधी लांब उडी आणि पुलअप्स हे दोन प्रकार वगळण्यात आले होते, त्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

या निकषानुसार लवकरच सुमारे ११ हजार रिक्‍त जागांसाठी भरती मोहीम राबविण्यात येईल. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील भरतीचे निकष बदलण्यात येणार असून, याबाबतचा शासन आदेश गृहमंत्रालयाकडून काढला जाणार आहे. या माध्यमातून पोलिस दलास सक्षम जवान मिळणार असून, याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होईल असे बोलले जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यातच याबाबतचे सूतोवाच केले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा