मुंब्य्रात धर्मांतर झाले नसल्याचा पोलिसांचा खुलासा, जितेंद्र आव्हाड म्हणतात युपी पोलिसांनी माफी मागावी

ठाणे १३ जून २०२३: मुंब्य्रात ४०० मुलांचे धर्मांतर झाल्याचा आरोप युपी पोलिसांनी केल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. मात्र हा आरोप खोटा असून मुंब्य्रात एकाही मुलाचे धर्मांतर झाले नसल्याचा खुलासा मुंब्रा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आणखी आक्रमक झाले. खोटे आरोप करून बदनामी करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांनी, महाराष्ट्राची माफी मागावी याकरिता त्यांना कडक शब्दात पत्र पाठवावे, अशी लेखी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.

मुंब्य्राच्या बदनामीने येथील विकासावर तसेच नव्या होणाऱ्या गुंतवणुकीवरही वाईट परिणाम होत आहेत, असे येथील स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे. या निषेधार्थ सोमवारी येथील रेल्वे स्थानक ते बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान तेथील रहिवाश्यांनी रॅली काढली. या रॅलीत मोठ्या संख्येने सर्वधर्मीय तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

‘धर्मांतराच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि पोलीस शांत का?’ असा सवाल देखील आव्हाडांनी उपस्थित केला आहे. येणाऱ्या निवडणूका जिंकण्यासाठी, सध्या राज्यसरकार पुरस्कृत दंगली घडत आहेत. म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरात पहिल्यांदा दंगल झाली. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, मुंब्य्रातही धर्मांतराचा विषय काढून दंगल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदू मुस्लिम यांना बदनाम करताना, मुंब्रा बदनाम पर्यायाने आव्हाड यांना बदनाम करण्याचा डाव आता उलटा पडल्याचेही त्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा