अंबोडी येथे अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुरंदर ३१ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील अंबोडी येथे तीन दिवसापूर्वी एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २८ रोजी तालुक्यातील अंबोडी येथे वनविभागाच्या हद्दीलगत शेतामध्ये एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्ती आढळून आल्या होत्या. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर या व्यक्तींनी तेथून पोबारा केला होता. या घटनेतील आरोपींची पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा पुरावे नव्हते. मात्र यानंतर सुद्धा सीसीटीवी फुटेज तसेच गुप्त माहितीगारातर्फे माहिती मिळवून पोलिसांनी आज सासवड येथे राहणारे अरबाज इक्बाल बागवान व अनिकेत संपत इंगोले राहणार सासवड या दोघांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरबाज बागवान याचे २१ वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका हॉस्पिटलमध्ये दोघे नवरा-बायको असल्याचे बसवून त्यांनी डिलिव्हरी करून घेतली. यानंतर हे बाळ मी सांभाळतो असे म्हणून पीडित मुलीकडून हे अर्भक अरबाज याने ताब्यात घेतले. यानंतर त्याचा मित्र अनिकेत इंगोले त्याच्याबरोबर आंबोडी येथील शेतात जाऊन हे बाळ पुरण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी पाहिल्याने हा प्रयत्न फसला. याबाबत सासवड पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने हे करीत आहेत. या घटनेने पुरंदर तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास तातडीने लागावा म्हणून पोलिसांवर मोठा दबाव होता. सासवड पोलिसांनी तीन दिवसातच या घटनेचा छडा लावून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे सासवड पोलिसांचे लोकांकडून कौतुक होत आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा