नाशिक, ५ ऑगस्ट २०२३ : भयमुक्त नाशिकसाठी पोलीस प्रशासन सरसावले असून, सराईत व धोकादायक गुन्हेगार गजाआड करण्यासह जेष्ठ नागरिक, महिला, मुले-मुली, विद्यार्थी यांच्या सुरक्षेस प्राधान्य दिले जात आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करुन शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्का, एम.पी.डी.ए. तसेच इतर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
शहरातील अवैध व्यवसायांना लगाम घालण्याकरिता अंमली पदार्थविरोधी पथक, गुंड विरोधी पथक, खंडणीविरोधी पथक, दरोडा व शस्त्र विरोधी पथक, इतर पथके तयार करुन अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आयुक्त शिंदे यांनी पोलिस ठाण्याच्या मूल्यांकनसह प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनाला सुरुवात केली असुन नागरिकांच्या संवादातूनही ते गुन्हेगारांची माहिती घेत आहेत.
नाशिकरोड वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यात मोक्का प्रस्तावित करत, गुन्हेगारांना आता कठोर कारवाई होणार असल्याचा सूचना वजा इशारा आयुक्तालयाने दिला आहे. यासह चौकसभांच्या माध्यमातून नागरिकांद्वारे मिळणारी गुन्हेगारी कृत्यांची खबर घेत, संशयितांची धरपकड सुरू झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर