जालन्यात कॉफी शॉपमध्ये प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे, ३ कॉफी शॉपवर पोलिसांचा छापा

जालना ४ जानेवारी २०२४ : जालन्यात कॉफी शॉपमध्ये प्रेमीयुगुलांनां अश्लील चाळे करण्यास मुभा देणाऱ्या ३ कॉफी शॉपवर पोलिसांनी छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या जुना जालना भागातील दोन तर शहराबाहेरील प्रशांतीनगर भागातील एक अशा तीन कॉफी शॉपवर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या पथकाने अचानक धाडी टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी छापे मारलेल्या ३ कॉफी शॉपमध्ये नको त्या अवस्थेत चाळे करणारे प्रेमीयुगुल दिसून आले. कॉफी शॉप मालकांनी अश्लील चाळे करण्यासाठी खोल्या पुरवून अवैध धंदा चालू केला होता असे यावेळी पोलिसांच्या निदर्शनास आले. आंबटशौकीन ग्राहकांना अश्लील चाळे करण्याची व्यवस्था पुरवून पैसा कमावला जात असल्याचे या छाप्यात उघड झाले आहे.

आंबटशौकीन ग्राहकांसाठी एका तासासाठी एका खोलीचा ५०० ते १००० रुपये दर ठरलेला होता. जुन्या जालन्यातील गांधी चमन भागात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गजेंद्र सुनील सुपेकर याचे कॉफी शॉप आहे. या शॉपवर पोलिसांनी छापा मारला तेंव्हा दोन प्रेमीयुगल नको त्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसही चक्रावून गेले होते. इथून जवळच असलेल्या टाऊन हॉल भागातील तिरुपती प्लाझामधील कॉफी शॉपवर पोलीस निरीक्षक महाजन यांनी छापा टाकला तेंव्हा त्या ठीकाणी देखील २ प्रेमीयुगल आढळून आले आहेत. हा कॉफी शॉप मेघराज दत्तात्रय चव्हाण याच्या मालकीचा असल्याची माहिती समोर येत आहे. गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी जालना शहराबाहेरील प्रशांतीनगर भागातील कॅफेवर छापा मारला. छाप्यात तिथेही ३ प्रेमीयुगल आढळून आले आहेत. या कॅफेचा मालक अमोल दुर्गादास जाधव असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या उपनिरीक्षक प्रियंका तुपे, उपनिरीक्षक मंगल सुडके, महिला अंमलदार शोभा कदम, संगीता चव्हाण, आरती साबळे, प्रियंका बोरकर, भारत ढाकणे, प्रदीप करतारे, चालक संजय कुलकर्णी आदींनी ही कामगिरी केली आहे.

जालना शहरातील आंबट शौकीन व प्रेमी युगुल यांच्यासाठी अश्या सोयी पुरवण्याचा धंदा जोरात असून त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा या निमित्ताने पुन्हा होऊ लागली आहे.पोलिसांच्या आजच्या धडक कारवाईत सापडलेले प्रेमीयुगल अंदाजे १८/२० वयोगटातील आहेत. पोलिसांनी तीघा कॅफे मालकांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा