मंचर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री व वाहतूक बंद असतानाही आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावच्या हद्दीत हातभट्टी ची दारू वाहतूक करणाऱ्यावर मंचर पोलिसांनी छापा टाकून सुमारे १७,५०० रुपये किमतीची दारू व दारू वाहतूक करणारे बोलेरो गाडी जप्त केली आहे.याबाबत गणेश रुपाजी मुंजाळ (रा.कवठे येमाई,ता.शिरूर ) यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक सागर गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि १७ रोजी रात्री २:३९ च्या सुमारास मंचर पोलीस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक राहुल लाड , पोलीस नाईक सागर गायकवाड,पोलीस सी.जी.वाघ हे पोंदेवाडी परिसरात गस्त घालत असताना एम.एच १६ ए.वाय. ५५३१ ही पीकअप शिरूर वरून पारगाव कडे जात होती. यावेळी पोलिसांनी पिकअप थांबवण्यासाठी सांगितले असता ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही व तो पुढे निघून गेला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याची गाडी थांबवली असता, त्याच्या गाडीत पाठीमागे काही भाजीपाला व भाजीपाल्याचे आतमध्ये सुमारे १७,५०० रुपये किमतीची हातभट्टीची दारूचे एकूण चार प्लास्टिकचे ड्रममध्ये आढळून आले. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव गणेश रूपाजी गुंजाळ (रा.कवठे यमाई ता. शिरूर )असे असून आपण हा माल घरी तयार केला आहे. तो मांजरवाडी येथे विकण्यास चालवलेल्या असल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी संचारबंदी असतानाही अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या या इसमावर माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याच्या ताब्यातील २,००,००० ची बोलेरो गाडी,१७,५०० रुपयाची हातभट्टीची दारू ,१,५०० रोख रक्कम असा २,१९,००० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा असून पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.