कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

कल्याण, दि. १६ जुलै २०२०: कल्याण डोंबिवलीतील पुन्हा लॉकडाऊन घोषित केलाय तरी देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ४१५ गाड्या जप्त करून सुमारे अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

केडीएमसी पथकाच्या मदतीने मास्क न लावलेल्या, रस्त्यावर थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या बेफिकीर नागरिकांकडून १ लाख ११ हजार २५० रूपये आणि नाकाबंदी दरम्यान ट्रॅफीकच्या मदतीने एकुण १ लाख ३५ हजार असे एकुण २ लाख ४६ हजार २५० रूपये दंड वसुल केला आहे. ही कारवाई केडीएमसी आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

कल्याण डोबिवली महापालिका आयुक्तांनी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस ठाण्यातून व रिक्षाद्वारे अनाऊन्समेंट करून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कल्याण विभागातील ४ पोलीस स्टेशन अंतर्गत ८ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले आहेत..

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा