ओडिशाच्या मंत्र्यांवर गोळी झाडणारा पोलीस कर्मचारी मानसिक रुग्ण; पत्नी म्हणाली,

भुवनेश्वर , ३० जानेवारी २०२३ : ओडिशा राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबकिशोर दास यांच्यावर सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपालकृष्ण दास याने गोळ्या झाडल्याची घटना काल घडली. यामध्ये नबकिशोर दास यांचा मृत्यू झाला. ते साठ वर्षांचे होते. दरम्यान, आरोपी गोपाल दास हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा आता त्याच्या पत्नीने केला आहे.

  • गोपालकृष्ण दास बायपोलर डिसऑर्डर आजाराने ग्रस्त

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल दास यांच्या पत्नीने सांगितले की, गोपालकृष्ण दास बायपोलर डिसऑर्डर या आजाराने ग्रस्त असून मागच्या आठ वर्षांपासून ते उपचार घेत आहेत. यासोबतच ब्रह्मपुर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे मनोचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर त्रिपाठी यांनी देखील गोपालकृष्ण दास मनोरुग्ण होता, असे सांगितले आहे.

डॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले की, दास दहावर्षांपूर्वी माझ्याकडे उपचार घेण्यासाठी आला होता. त्याला खूप लवकर राग यायचा. त्याच्यावर मी उपचार करत होतो. मात्र तो औषधे वेळेवर घेत होता की नाही याबाबत मला खात्री नाही. जर औषधे वेळेवर घेतले नाहीत, तर हा आजार पुन्हा उसळू शकतो. गोपालकृष्ण अखेरचा माझ्याकडे वर्षभरापूर्वी आला होता. त्यानंतर तो भेटायला आला नाही.

तर गोपालकृष्णच्या पत्नीने सांगितले की, माझ्या पतीचे आणि मंत्र्यांचे वैयक्तिक काही शत्रुत्व नव्हते. गोपाल औषधे घेत होता आणि सामान्य वर्तन करत होता. या घटनेच्या काही वेळ आधीच त्याने आपल्या मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला होता. मात्र अचानक असे काय झाले की, त्यांनी मंत्र्यांवर गोळी झाडली? याबाबत मला कल्पना नाही, असे म्हटले आहे.

  • गोळीबारात नबकिशोर दास यांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपालकृष्ण दास याला रविवारी मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. मंत्री दास हे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपल्या गाडीतून उतरले तेव्हा गोपालकृष्णने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी मंत्री दास यांना लागली. यानंतर गोपालकृष्णने हवेत गोळीबार करुन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्याला पकडले. दरम्यान, गोळी लागल्यावर मंत्री दास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा