पुरंदरच्या दक्षिण – पुर्व पट्ट्यात सततच्या पावसामुळे डाळिंब व ऊस पीक धोक्यात

पुरंदर, दि. २ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील राख आणि गुळूंचे या डाळिंबाची लागवड जास्त असलेल्या भागात गेली दहा दिवस सतत पाऊस पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या दहा दिवस पासून सतत पडत असलेल्या पावसामुळे डाळिंब उत्पादक व ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

राख, गुळूंचे, कर्नलवाडी या  गावांमध्ये गेले दहा दिवस अनेक वेळा पावसाने दमदार हजेरी लावली असून या भागांमधील अनेक ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरले आहेत. सतत पडणाऱ्या या पावसामुळे फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याभागात  शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे या भागाची दुष्काळी असलेली ओळख पुसली असून या भागातील शेतकऱ्यांकडे सधन शेतकरी म्हणून पाहिले जात आहे. डाळिंब बागांच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.

मात्र मागील दहा दिवसांत सतत होणाऱ्या पावसामुळे डाळिंबाच्या फळबागांना तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच फळ कुज, खरड्या रोग पडला आहे. त्यामुळे मृग बहार धोक्यात आला असून त्याचबरोबर बाजरी, मका यासारखी पिके जमीनदोस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. सदर पिकांचे पंचनामे व्हावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

त्याचबरोबर आडसाली ऊसाच्या लागणीमध्ये पाणी साचल्याने सदर ऊसबेण्याची उगवण क्षमता कमी झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये जरी पावसाने दिलासा निर्माण केला असला तरी पिकांचे नुकसान होण्याची धास्ती ही लागली आहे.

”पर्जन्यामान हे महसुली मंडलाच्या ठिकाणी केले जाते. या भागाचे मंडल ८ कि.मी अंतरावर वाल्हे याठिकाणी आहे. तेथे आजही पावसाचे प्रमाण कमी आहे. गुळूंचे, कर्नलवाडी, राख गावात गेली दहा दिवसांत ३५ ते ४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. गाव कामगार तलाठ्यांना या नुकसानीची कल्पना देण्यात आली आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल व कृषी विभागाने करणे गरजेचे आहे.” – अक्षय निगडे (डाळिंब उत्पादक, गुळूंचे)

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा