पुणे, ४ जुलै २०२३: गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील “विद्या प्रबोधिनी” या संस्थेने गुरु पूजनाचा एक भव्य आणि दिव्य असा समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी भारतातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नामवंत मंडळी यांच्या पूजनाचा कार्यक्रम काल संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर पद्मविभूषण आदरणीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर सर, पद्मविभूषण आदरणीय प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ.के एच संचेती सर, पद्मभूषण आदरणीय सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां ब मुजुमदार सर, पद्मश्री आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक श्री. गिरीश प्रभुणे सर, लेफ्टनंट जनरल आदरणीय डॉ.डी बी शेकटकर सर, एअरमार्शल आदरणीय श्री प्रदीप बापट सर, आदरणीय माजी कुलपती डॉ.गो बं देगलूरकर सर, आदरणीय ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा.डॉ. श्री द महाजन सर, आदरणीय ज्येष्ठ संशोधक प्रा डॉ. सदानंद मोरे सर, आदरणीय नॅनो शास्त्रज्ञ डॉ.सुलभा ताई कुलकर्णी, आदरणीय संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.अशोक कामत सर, आदरणीय ज्येष्ठ गिर्यारोहक उषःप्रभाताई पागे, आदरणीय ज्येष्ठ गणितज्ञ प्रा.रवींद्र कुलकर्णी सर अशा महामहीम आणि याव्यतिरिक्त, “ज्ञान” या शब्दाचे ज्यांनी अत्युच्च टोक गाठलं आहे, अशा भारतातील अनेक ज्येष्ठ गुरुजनांचे यावेळी पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ‘सोहम ट्रस्ट, पुणे’ ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ चे डॉ.अभिजित सोनवणे पाहुणे म्हणून आमंत्रित होते. या वेळी डॉ.सोनवणे यांनी कार्यक्रमाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, खऱ्या समुद्राला लाजवेल असा ज्ञानाचा महासागर खऱ्या अर्थाने इथे उफाळून आलाय. मी या आदरणीय व्यक्तींसोबत प्रत्यक्ष या कार्यक्रमाला हजर आहे, या विचारानेच मी भारावून गेलोय, दिपून गेलोय. आज या सर्व गुरुजनांना पाहून मनातील इच्छा सुद्धा पूर्ण झाली. आयुष्यात आलेल्या चांगल्या व्यक्तींचे विचार आत्मसात करून, त्या विचारांप्रमाणे वागल्यास कुरुक्षेत्राचे, “गुरुक्षेत्र” व्हायला वेळ लागणार नाही, आणि असे “गुरुक्षेत्र” निर्माण झाल्यास सर्व युद्धे थांबतील, आपल्या आतली आणि बाहेरची सुद्धा.
अत्यंत भावपूर्ण अशा वातावरणात संपन्न झालेल्या, या समारंभात उपस्थितांचे डोळे पाणावले आणि या गुरुवर्यांसमोर आपोआप हात जोडले गेले. सर्व उपस्थितांनी या सर्व गुरुजनांना नतमस्तक होऊन प्रणाम केला.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे