औंध (पुणे), ७ सप्टेंबर २०२०: पुणे शहराच्या सीमेवर असलेले औंध गाव एक मोक्याचं ठिकाण बनत चाललं आहे. परंतु पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता अतिशय बदहाल परिस्थितीत आहे. स्मार्ट सिटीचं स्वप्न पाहणाऱ्या महानगरपालिकेचं मात्र या मोक्याच्या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं दिसत आहे. राजीव गांधी पुलाच्या अलीकडचा शंभर मीटरचा रस्ता अतिशय दुरावस्थेत आहे. महत्त्वाचे म्हणजे युनिव्हर्सिटी रोड आणि राजीव गांधी पुलाला जोडणारा हा शंभर मीटरचा रोड डांबराचा बनवला आहे. त्यामुळे दरवर्षीच येथे पावसाळ्यात खड्डे पडलेले दिसतात.
औंध भागातील सिद्धार्थनगर, युनिव्हर्सिटी रोड वरून येणारं पुण्यातील ट्राफिक आणि सांगवी, पिंपरी चिंचवड या भागातून येणारं ट्राफिक याच ठिकाणी एकत्र येतं. औंध गाव आणि सिद्धार्थनगर या दोन्ही बाजूने मुख्य रस्त्याला जोडलं जाणारं ट्राफिक आणि युनिव्हर्सिटी रोडचं भरधाव ट्राफिक यामुळे इथं नेहमीच वाहतुकीची कोंडी पाहण्यास मिळत असते. त्यात पावसाळ्यात या भागात असलेल्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिकची समस्या आणखीनच वाढत आहे.
वेळ प्रसंगी अपघात देखील होत असतात. पुणे शहराची हद्द इथं संपते. त्यामुळं इथं दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न उभा राहिला आहे. औंध भाग स्मार्ट सिटी अंतर्गत प्रशस्त करण्यात आला असला तरी मुख्य रस्त्याची ही दुरवस्था या स्मार्ट सिटी ला गालबोट लावण्याचं काम करत आहे. नागरिकांनी सुद्धा वारंवार येथील नगरसेवकांना या बाबत तक्रार केली मात्र कोणतही काम इथं झालेलं दिसलं नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे