पोलिस भरतीला मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत स्थगिती द्या- संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे , १८ सप्टेंबर ,२०२० : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे.अशातच सर्वोच्च न्यायालयाने सध्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून , जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत सरकारने पोलिस भरतीलाही स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे.

बुधवारी १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलिस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने पोलिस भरतीसाठी १२ हजार ५३८ इतक्या जागांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असं संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पाठवण्यात आलेल्या निवेदन पत्रामध्ये लिहिलं आहे.

बहुसंख्य आणि मुख्य समाज असणाऱ्या मराठ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता होणारी पोलिस भरती थांबवावी. ही आमची मागणी सरकारने पूर्ण न केल्यास आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करु. त्यानंतर होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास आपले महाविकास आघाडीचे सरकार कारणीभूत ठरेल, असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष सुधीर पुंडे यांनी त्या पत्राव्दारे दिला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष श्रीकांत काकडे, संघटक ईश्वर खंडागळे, विशाल गोरे, समाधान माने, प्रसिद्धी प्रमुख भरत सवडे इत्यादी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा