पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

पिंपरी, ७ ऑगस्ट २०२३ : पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागातील रस्त्यावर लहान-मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे; मात्र शहरातील तब्बल ९० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने केला आहे. यंदा पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यातून मुख्य तसेच, सिमेंटचे रस्तेही सुटलेले नाहीत.

पावसाचे पाणी साचण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्या खड्ड्यात वाहने आपटून लहान-मोठे अपघात होत आहेत. तेथून ये-जा करताना पादचारीही वैतागले आहेत. तक्रारीनंतर खड्ड्यात मुरुम, खडी व डांबर टाकून दुरुस्ती केली जात आहे. पण पावसामुळे तेथे पुन्हा खड्डे पडत आहे. त्यामुळे खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऐन पावसाळ्यात व साचलेल्या पाण्यात पालिकेच्या वतीने रस्ते डागडुजीचे काम केले जात आहे.

यंदाच्या पावसाळ्यात शहरात १ जूनपासून आतापर्यंत विविध रस्त्यावर ३ हजार ६४६ खड्डे पडल्याचे महापालिकेच्या निर्देशनास आले आहे. त्यापैकी ३ हजार २२७ खड्डे बुजविण्यात आले आहेत. एकूण ९० टक्के काम झाले असुन ४१९ खड्ड्यांची दुरुस्ती करणे बाकी आहे. ही दुरुस्ती मुरुम, खडी, डांबर टाकून काम सुरू आहे. असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा