मतपेटीतून राग व्यक्त केल्याशिवाय रस्त्यावरील खड्डे बुजणार नाही, राज ठाकरे यांचे मतदारांना आवाहन

पुणे, १८ ऑगस्ट २०२३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी रस्त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना परखड मत व्यक्त केले. यापूर्वी राज ठाकरे यांनी शहरातील खड्ड्यांवरून आंदोलन करण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर पुणे शहरात १६ ठिकाणी आंदोलन करण्यात आली. मनसेकडून विविध रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले गेले आणि रांगोळी काढली गेली. आता शुक्रवारी या खड्ड्यांना मतदारच कसे जबाबदार आहे? हे राज ठाकरे यांनी सांगितले.

पुणे शहर वाढले आहे. परंतु शहराचे टाऊन प्लॅनिंगच झालेले नाही. यामुळे पुणे शहरात १५ ते २० मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर लागतो. टाऊन प्लॅनिंग मुंबईत इंग्रजांनी केलेले आहे. त्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांनी शहरांचा आराखडाच केला नाही. यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत असे राज ठाकरे यांनी सांगितले. हे लोक निवडणुकी पुरते येतात. मते मिळाली की बाकी गेले तेल लावत असे सुरू आहे, असेही ठाकरे म्हणाले.

पुणे शहरातील खड्डयासंदर्भात मनसेने आंदोलन सुरु केले आहे. कोथरूड, सेनापती बापट रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता, मॅाडेल कॉलनी, कोंढव्यासह १६ ठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. परंतु रस्त्यावरील खड्यांना मतदारच जबाबदार आहे. कारण हे खड्डे काय पहिल्यांदाच पडले नाहीत. रस्त्यावर खड्डे असताना मतदार पुन्हा त्याच लोकांना निवडून देतात. मतपेटीतून राग व्यक्त केल्याशिवाय रस्त्यावरील खड्डे बुजणार नाही. जे महाराष्ट्राचे नुकसान करतात त्यांना तुम्ही निवडून देता, असे मतदारांना उद्देशुन राज ठाकरे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा