मिरची आणि पपई या पिकांना पीक विम्यातून वगळले, नंदुरबार मधील शेतकरी निराशेच्या छायेत

नंदुरबार, १४ ऑगस्ट २०२३ : नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कृषी विभाग आणि महसूल विभागाने अधिक प्रचार केल्यामुळे १ लाख ३७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच अनेक शेतकरी पीक विम्याच्या योजनेत सहभागी होण्यासाठी एकत्र आले. नंदुरबार जिल्ह्यात मिरची आणि पपई ही पीके प्रामुख्याने घेतली जातात. ही दोन्ही पीके पीक विम्यातून वगळ्यामुळे अनेक शेतकऱ्यानी नाराजी व्यक्त केली आहे. इतर पीके असलेले शेतकरी पीक विमा काढत आहेत. तर मिरची आणि पपई या पिकांचा विम्यात समाविष्ट केला तर अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मिरची आणि पपई या पिकांचा समावेष करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मान्सूनचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात उशिरा दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उशिरा पेरणी केल्यामुळे त्याचा पिकांवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर जुलै महिन्यात अधिक पाऊस झाला होता. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु सध्या मागच्या दहा दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंता व्यक्त करीत आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे याचा फटका पिकांना बसणार आहे.

नंदुरबार बाजार समित्यांमध्ये सध्या धान्य आणि कडधान्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे चढ्या दरात विक्री चालू असल्याची चर्चा सगळीकडे आहे. सध्या तूर प्रति क्विंटल ७ हजार रुपये, हरभरा ८ हजार रुपये मात्र सोयाबीनची साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर दिवसेन दिवस कमी होत आहेत. परंतु सोयाबीनला चांगला भाव कधी मिळणार याची प्रतीक्षा आता शेतकरी करीत आहे. सोयाबीन सोबतच गव्हाची देखील तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. गव्हाची किंमत चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांना भाव परवडत नसल्याचे दिसून येत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा,नंदुरबार,तळोदा आणि नवापूर या चार बाजार समित्यांमध्ये तूर आणि हरभरा यांना चांगला भाव मिळत असल्याने आवक देखील चांगली येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा