पंजाबवर ओढावलं वीज कपातीचं संकट, कोळशाचा पुरवठा खंडित

पंजाब, ४ नोव्हेंबर २०२०: कोळशाच्या कमतरतेमुळं पंजाबमध्ये विजेचं संकट निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांच्या रेल्वे रोको आंदोलनामुळं राज्यात कोळशाच्या साठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंजाबच्या वीज प्रकल्पांमधील वीज टंचाई १०००-१५०० मेगावॅटपर्यंत वाढली. जीव्हीके थर्मलमध्ये देखील विजेची कमतरता आहे. अशा परिस्थितीत वीज विभागाकडं वीज कपाती शिवाय पर्याय नाही.

सरकारी प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, राज्यात सध्याची मागणी सुमारे ५१००-५२०० मेगावॅट आहे तर रात्रीची मागणी सुमारे ३४०० मेगावॅट आहे. दुसरीकडं, पुरवठा पूर्णपणे अपुरा आहे. पंजाबच्या औष्णिक प्लांट मध्ये इतर राज्यांमधून कोळसा पुरवठा केला जातो आणि रेल्वेच्या माध्यमातूनच हा कोळसा पंजाब मध्ये पोहोचवला जातो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मालगाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

बठिंडामधील तळवंडी साबो येथे पंजाबमधील सर्वात मोठा औष्णिक प्रकल्प २,००० मेगावॅट विजेचं उत्पादन करतो. नाभा, पटियाला येथे आणखी एक मोठा औष्णिक प्रकल्प १,४०० मेगावॅट वीजनिर्मिती करतो. याशिवाय पंजाब मध्ये विजेची कमतरता भासू नये म्हणून आणखीन तीन छोटे औष्णिक प्रकल्प देखील आहेत. परंतु, कोळशाचा पुरवठा खंडित झाल्यामुळं आता या औष्णिक प्रकल्पांवर वीज निर्मितीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसपीसीएल) नॅशनल ग्रीड आणि इतर राज्यांकडून वीज खरेदी करून राज्यातील वीज मागणीची पूर्तता करत आहे. परंतु ही वीज खरेदी करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय ग्रीड व इतर राज्यांना कोट्यवधी रुपये आगाऊ पैसे द्यावे लागतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा