इंदापूर, ११ सप्टेंबर २०२२:सत्ता असो वा नसो विकासकामांचे माझ्यावर सोडा. या राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आहेत. अजित पवार हे दादाच आहेत. त्यामुळे विकासाच्या बाबतीत काळजी करू नका, असा विश्वास माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी परिसरातील ग्रामस्थांना दिला. निंबोडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी आ. भरणे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून देखील विकासासाठी मोठी मदत होत आहे. काही लोकांना तुमच्या पाण्याचं, विकासाचं काही देणं-घेणं नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. राजकारणाचं भांडवल करून ते स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम गेली २० ते २५ वर्षांपासून करीत आहेत. निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. आमदार गप्प नसतो, माझं कार्यक्षेत्र बावड्याच्या कोपऱ्यापासून ते भवानीनगरपर्यंत आहे. त्यामुळे काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात.
या भागातच नाही तर बावड्याच्या पाटलांना देखील सायफन माहिती नव्हता, तेव्हा भरणेवाडीला सायफन माहिती होता. शेतात उसाची लागण सुरु झाल्यानंतर विजेची बोंब असायची. त्यामुळे दाऱ्यावरच्या गड्याला जेवायला सोडावं लागायचं. त्यावेळी हा मामा हातात खोरे घ्यायचा. त्यामुळे शेतकऱ्यांचं काय दुःख असतं ते मला माहिती असल्याचे देखील या वेळी आ. भरणे म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड