कल्याण डोंबिवलीत वापरलेले पीपीई किट टाकले उघड्यावर

कल्याण, दि. १७ जुलै २०२०: कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची सख्या कमी व्हावी यासाठी सध्या धारावी पॅटर्न राबवला जातोय. केडीएमसीमध्ये लॉकडाउनचे कडक नियम हे पाळले जात आहेत. एवढंच नव्हे तर महापालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या कोवीड रुग्णालयांवर पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मात्र कल्याणातील बैलबाजार स्मशानभूमीत वापरलेल्या पीपीई किटचा खच पडलेला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरात असलेल्या स्मशानभूमीत अज्ञात रुग्णवाहिका कर्मचारी आपले वापरलेले पीपीई किट, हँड ग्लोव्हज त्याचठिकाणी काढून टाकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अनेकदा याठिकाणी असलेले भटके कुत्रे हे किट उचलून इतरत्र नेत असल्याने त्यातून इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र कोरोना होण्याच्या भितीपोटी याठिकाणी स्वच्छतेसाठी कर्मचारी नियमितपणे येत नसल्याने स्मशानभूमीत कार्यरत कर्मचाऱ्यांकडून किंवा खासगी मदतनीसांच्या साहाय्याने हे किट जाळून टाकण्यात येत आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला असून पालिकेने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा