मुंबई, 3 एप्रिल 2022: पाडव्या निमित्त काल राज ठाकरेंनी दादर येथील शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यात भाषण केलं. यावेळी ते भाजपची स्तुती करताना दिसले. नुकतेच उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांत भाजप चे सरकार आलं आहे. याचे देखील त्यांनी कौतुक केलं. यादरम्यान त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे टीकेचा रोख होता. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात भाजपचं पुन्हा सरकार आलं. तिथं विकास होतोय हेच पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीत फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
उत्तर प्रदेशचा निकाल लागला. तिथे विकास होतोय. हेच पाहिजे. मोदी सत्तेत आल्यावर उत्तर प्रदेश बिहार झारखंडकडे त्यांनी पहावं. या तीन राज्यातून लोक बाहेर पडतात हे मी 2014 मध्ये बोलत होतो. तिकडे विकास होतोय हे ऐकून आनंद वाटतो. प्रत्येक राज्यात व्हाव. सर्वांचं ओझं घ्यायला महाराष्ट्र बसला नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी याद्वारे एक प्रकारे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं कौतूक केलं आहे.
तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत होता
भाजप एक नंबरचा पक्ष, शिवसेना दोन नंबरचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरचा पक्ष होता. तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत होता. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता. तुमचं अडीच अडीच वर्ष ठरलं होतं. तुमचं आतलं झंगाट होतं. तुम्हाला मतदान भाजप आणि शिवसेना म्हणून केलं होतं. शरद पवारांसोबत जाण्यासाठी केल नव्हतं. आम्ही सगळं विसरुन जातो. तास तास दोन तास उभे होतो. भाषण ऐकली, मतदन केलं निर्णय आला त्यावेळी महाराष्ट्राचा निर्णय वेगळा दिसला. याच्यासाठी मतदान करता, गुलाम आहात यांचे कोणीही यावं आणि फरपटतं न्यावं. लोकांनी विसरुन जावं हे यांना हवं आहे.
राज ठाकरेंना मुंबई महापालिकेत फायदा होणार?
आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. मुंबईत मराठी मतदारांचा आकडा कमी होत चालला आहे. यामुळं मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची असल्यास इतर भाषिक मतदारांच्या मतांची गोळा बेरिज असणं आवश्यक आहे. मुंबईतील मराठी मतदारांचा टक्का हा आता 35 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ याचं कौतुक केलंय,त्यामुळं उत्तर भारतीय सोबत गुजराती मतदारांचा मनसेला फायदा होऊ शकतो का हे पाहावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे